Ad will apear here
Next
मल्हारराव होळकर


कटकेपासून अटकेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करणारे, १७व्या शतकात मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

मराठेशाहीत दरारा निर्माण करणारे व सतराव्या शतकात मराठेशाहीचा मुख्य आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार म्हणजे राजे मल्हारराव होळकर. अठराव्या शतकात जवळपास पन्नास वर्षे विलक्षण पराक्रमाने अनोख्या मुत्सद्देगिरीने संपूर्ण देशाच्या इतिहासात तळपणारे मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी जेजुरीजवळील होळ येथे झाला. इतिहासातील एक कर्तबगार सेनानी, इंदूर संस्थानचे संस्थापक म्हणून मल्हारराव होळकर यांचे नाव अजरामर झाले. 

मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. मल्हारीची आई जिवाई मल्हारराव यांना घेऊन माहेरी खानदेशात आली. मल्हारराव यांचे बालपण आजोळी मामाकडे गेले. मल्हाररावांना आजोळात लष्करात नोकरी मिळाली. १७२० मध्ये पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. 

बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोडदळात सामील करून घेतले. त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. बाजीरावांनी १७२५मध्ये मल्हाररावांना घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशाची कामगिरी दिली. तसेच माळवा प्रांतातील चौथाई आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली.

पुढे आपल्या पराक्रमाने मल्हारराव होळकर पेशव्यांचे इंदूर संस्थानचे अधिपती झाले. अवघ्या वीस वर्षांतच मल्हारराव यांच्याकडे ७४ लक्षाचा मुलुख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्या वेळी मल्हाररावांनी धनगर जातीचे अनेक लोक इंदूरमध्ये आणले. बाजीरावाने त्यांना गुजरात, माळवा व खानदेश प्रांताचा सरंजाम नेमून दिला होता.

मल्हाररावांच्या विनंतीप्रमाणे पेशव्यांनी त्यांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने ३ लक्ष उत्पन्नाचा सरंजाम नेमून दिला होता. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहान-मोठ्या एकंदर ५२ लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी १७२९ आणि १७३१मध्ये गिरीधरबहादूर व दयाबहादूर यांच्याशी झालेली लढाई व त्या दोघांचा केलेला पराभव हे महत्त्वाचे मानले जाते. पेशव्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये मल्हाररावांनी सहभाग घेऊन शौर्य दाखवले. याच सुमारास बराच मुलूख मल्हाररावांनी जिंकला आणि महेश्वर येथे आपले मुख्य ठाणे केले. 

१७४३मध्ये सवाई जयसिंगाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत वारसा हक्काचे भांडण सुरू झाले, तेव्हा मल्हाररावांनी माधवसिंहास मदत करून गादीवर बसवले. त्याबद्दल त्यांना ६४ लक्ष रुपये खंडणी आणि रामपुरा, भानपुरा हे प्रांत मिळाले. १७५४मध्ये गाजी शहाबुद्दीन नावाच्या मुलास जाटाविरुद्ध मदत करून जाटाच्या मदतीस आलेल्या दिल्ली बादशहाचा मल्हाररावांनी पराभव केला. या वेळी जाटाच्या वेढ्यात खंडेराव हे त्यांचे एकुलते एक पुत्र तोफेचा गोळा लागून मरण पावले. त्यावेळी खंडेरावाची पत्नी अहिल्याबाई सोडून अन्य भार्या सती गेल्या. या प्रसंगी मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली की सुरजमलाचा शिरच्छेद करून माती यमुनेत टाकीन, तरच जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राणत्याग करेन. 

माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळाला मल्हाररावांनी संजीवनी दिली.

इ. स. १७२७मध्ये मल्हारराव होळकरांना एकून अकरा महाल फौजेच्या सरंजामासाठी दिले आणि मराठ्यांचे पाय कायमचे माळव्यात रोवले गेले. मल्हारराव होळकर धाडसी व शूर होते. ते फक्त युद्धकलेत निष्णात नव्हते, तर राजकारण आणि राज्यकारभार यातही हुशार व चाणाक्ष होते. आपल्या अमलाखालील प्रांताची वसूलनिहाय वर्गवारी करून ते उत्तम व्यवस्था लावत होते. एकदा घेतलेला निर्णय ते सहसा बदलत नसत. माळव्यातील आपल्या मांडलिक राजांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवे माधवराव आणि दादासाहेब मल्हाररावांना पित्यासमान मान देत होते. खंडेरावांच्या मृत्युनंतर अहिल्याबाई सती जाणार होत्या; पण अहिल्याबाईंना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली.

१७२५ ते १७२८ या काळात मल्हारराव इंदूरचे रहिवासी झाले. इंदूरला भल्या मोठ्या वाड्यात मल्हाररावांचा कारभार सुरू झाला.

आपल्या अर्धशतकाच्या राजकीय कारकिर्दीत मल्हाररावांनी आपले स्वतंत्र संस्थान निर्माण केले. उत्तर हिंदुस्थानात मराठी साम्राज्य उभारण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. तत्कालीन इतिहासात जे स्थान कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ, परसोजी भोसले इत्यादी सरदारांना आहे तेच स्थान मल्हारराव होळकरांचे असल्याचे दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या. 

पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हाररावांना मृत्यूने गाठले. अहिल्याबाईंनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. 

अशा या थोर मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RUERCW
Similar Posts
शहाजीराजे भोसले शहाजीराजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी मालोजीराजे व दीपाबाई ऊर्फ उमाबाईसाहेब यांच्या पोटी झाला. मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतः फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्याबरोबर राहत होते. मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दीपाबाई मालोजीराजे यांना दिली होती. नंतर त्यांचे नाव उमाबाई ठेवण्यात आले
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
लोककल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे लोककल्याणकारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहा फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language